प्रगती एक्स्प्रेसच्या चालकाचा खास गौरव ; रक्तबंबाळ अवस्थेतही कल्याणपर्यंत गाडी नेली
मुंबई, २२ एप्रिल / प्रतिनिधी
मुंबईहून पुण्याकडे निघालेल्या प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनावर घाटकोपर येथे पुलावरून अचानक आदळलेल्या एका दगडामुळे गाडीचा चालक गंभीररीत्या जखमी झाल्याची दुर्देवी घटना आज सायंकाळी घडली. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये त्यासाठी प्रगतीच्या चालकाने जखमी अवस्थेतच गाडी कल्याणपर्यंत चालविली. त्याच्या या कर्तव्यदक्षतेबद्दल रेल्वेकडून त्याला रोख रक्कम देण्यात येऊन त्याचा खास गौरव करण्यात आला.
छत्रपती...
more... शिवाजी टर्मिनसवरून दुपारी सव्वाचारच्या सुमारास निघालेली ही गाडी डाऊन जलद मार्गावरून घाटकोपर रेल्वे पुलाजवळ पोहोचताच एक दगडसदृश वस्तू जोरात येऊन इंजिनाच्या काचेवर आदळली. काच फुटून तिचे तुकडे ड्रायव्हर प्रदीप कुमार याच्या हातात व छातीमध्ये घुसल्या. त्यामुळे तो गंभीररीत्या जखमी झाला. तरीसुद्धा त्याने त्याच रक्तबंबाळ अवस्थेत गाडी कल्याण स्थानकापर्यंत नेली. त्याला कल्याण रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण येथून प्रदीप कुमार याच्या जागी अरुण गवळी या बदली ड्रायव्हरने प्रगती एक्स्प्रेस पुण्यापर्यंत नेली. काच फुटल्याने गाडी चालविण्यात अडथळा येत होता. त्यामुळे अंबरनाथ स्थानकात गाडीचे इंजिन बदलण्यात आले. परिणामी तेथे अर्धा तास खोळंबा झाला. मात्र घाटकोपर ते कल्याण जखमी अवस्थेत गाडी चालवून प्रवाशांचा खोळंबा टाळल्याबद्दल रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक राहुल जैन यांनी प्रदीप कुमारला एक हजार रुपयांचे बक्षिस दिले, अशी माहिती रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
courtesy- Loksatta news paper